VroyCLe™ Featured Post

संभाजी - विश्वास पाटील | प्रकरण-१ बिलामत | पान क्र.८ |

संभाजी - विश्वास पाटील | प्रकरण-१ बिलामत | पान क्रमांक ८ |

बिलामत । १




१.

जोत्याजी केसरकर, कवी कलश, जगदेवराव असे राजांचे उमदे सहकारी घोडा फेकत तेथे येऊन पोचले. त्यांच्या सोबतीनेच महार जातीचा रायाप्पा नाक चालला त्याच्या डोक्यावर जिरेटोप वा पीळदार मराठी पगडी नव्हती तर एक साधेच मुंडासे आणि अंगात घोंगडीच्या वस्त्रापासून बनवलेली काचोळी होती. तो दिसायला काळपट, उप्र, राकट मिशांचा आणि भेदक डोळ्यांचा शेतकरीच होता, पण तो आपला शंभूराजांच्या आणि कवी कलशांच्या सोबतच हाकत होता. रंगपंचमीच्या दिवशी तसे युवराज शंभूराजे नेहमी खुशाल आणि काहीसे स्वच्छंदी दिसत. मात्र आज त्यांच्या रात्रभराचे जाग्रण दिसत होते. डोळे ससाण्यासारखे काही तरी शोधत होते. त्यांचे सोबतीसुद्धा मध्यानरात्रीनंतर युवराजांच्या बरोबर भवानी कड्याच्या आणि टकमक टोकाच्या अंगाने दौड करून आले होते. सणाच्या मुहूर्तावर गडावर काही तरी गडबड होणार असल्याचा युवराजांना वास लागला होता. त्यामुळेच त्यांचे मूळचे पाणीदार, जागृत, पण आता काहीसे तारवटलेले डोळे चौफेर फिरत होते.गोदू पहारेकऱ्यांना"राजांच्या जिवाला धोका आहे-" असे कळवळून सांगत होती. तेवढ्यात शंभूराजांचा फुरफुरता घोडा तेथे समोर येऊन थांबला. वस्त्रे फाटलेल्या, गोंधळलेल्या स्थितीमध्ये उभ्या असलेल्या गोदूकडे युवराजांनी बघितले. शंभूराजांना समोर पाहताच गोदू त्यांच्याकडे भिंगरीसारखी धावली. ती ओरडली, "युवराजऽ युवराजऽऽ आपल्या राजांच्या जिवाला धोका आहे! राजांच्या जिवाला धोकाऽऽ--" शंभूराजांनी जोत्याजी आणि रायाप्पाला हळूच सांगितले, "सर्वापुढं वाच्यता नको. चला घ्या सोबत बाईला." शंभूराजांचा घोडा आपल्या महालाकडे उधळला. पाठोपाठ गोदूला घेऊन त्यांचे सहकारी वाड्याकडे त्वरेने गेले. आतल्या आपल्या खाजगी सदरेवर शंभूराजांनी चौकशीला सुरुवात केली. गोदूने आपल्या सासऱ्याच्या आणि नवऱ्याच्या पापाचा पाढा वाचला. शंभूराजांना प्रथमदर्शनी तिच्या बोलण्यात सत्यांश दिसला. सदरेवरची गडबड ऐकून तोवर येसूबाईही तेथे येऊन दाखल झाल्या होत्या. गोदूचे कथन ऐकून युवराज कवी कलशांना बोलले," आता पटली नं खात्री कविराज? ह्या पंचमीला काही तरी घडणार याची आम्हांला खात्री होतीच!" "आपण वेळेत दक्ष राहिलात खूप चांगलं झालं. पण राजन, गडावरचे सर्व पहारे-चौक्या तपासून झाल्या. आता कोणताही धोका नाही दिसत." "--असं म्हणून चालणार नाही, कविराज, आमचे आबासाहेब सांगतात तशी अखंड सावधानता हवी, चलाऽ आपण सर्वजण आपापल्या मोर्चावर चला. आणि कविराज, ते‌ वाडकर पितापुत्र इथं कुठं आढळले, तर त्यांना  तात्काळ कैद करा.

८ । संभाजी 
||| ==>> पुढील पान : | प्रकरण-१ बिलामत ||| संभाजी-विश्वास पाटील |||

Comments