VroyCLe™ Featured Post

संभाजी - विश्वास पाटील | प्रकरण-१ बिलामत | पान क्रमांक ४ |

संभाजी - विश्वास पाटील | प्रकरण-१ बिलामत | पान क्रमांक ४ |


बिलामत । १

१.

उलट थंडीच्या महिन्यात शेकोटीची धग घ्यायला मंडळी दाटीवाटीने गोलाकार बसावीत, तसे सारे एकदुसऱ्याला खेटून बसलेले. संवादांना कुजबुजीचे स्वरूप आले होते. श्वासोच्छ्वासांना कट-कारस्थानाची धार चढली होती, गोदूचा सासरा अंबकराव खदखदा हसला. आपले घारे डोळे गोलाकार फिरवत उपहासाने बोलला, "बस्स, फक्त उद्याचीच दुपार व्हायचा अवकाश, उद्याची रायगडावरची रंगपंचमी भोसल्यांच्या कुळीसाठी शिमगा ठरणार आहे. कोळ्यानं जाळं पेरावं, तसे जागोजागी निधड्या प्रतीचे चाळीस धारकरी पेरलेत, सकाळी नऊच्या प्रहराला त्या शिवाजीची अंबारी होळीच्या माळाजवळ सरकायचा अवकाश, वाघदरवाजाच्या वाटेवरची तोफ मशालीने शिलगावली जाईल. रंगाच्या फकी उडवू आणि त्याच्या आडोशानं त्या मग्रूर शिवा भोसलेचा कायमचा काटा काढू."  "आणि काही घोटाळा झाला तर?" आवंढा गिळत निवासरावाने विचारले."बहादूरगडाच्या तळावर जाऊन आम्ही खानसाहेबांशी कटाचं सारं बोलणं केलं आहे.सणाच्या निमित्तानं बारा कट्टर लढवय्ये वीर आधीच रायगडावर जाऊन पोचलेत. एकदा शिवाजी संपला अशी खुणेची तोफ उडायचा अवकाश, बाजूच्या झाडीतल्या मोगली तोफा, पथकं सुसाट बाहेर पडतील.रायगडासकट मराठ्यांचं नाक कापून टाकतील.” कटाची ती वीण उलगडून सांगताना त्र्यंबकरावचे डोळे भलतेच भेसूर दिसत होते. त्याच्या आत्मविश्वासाने समोरचे ते अपरिचित पाहुणेही चेकाळून गेले होते. त्र्यंबकरावाने अंगावरचे उपरणे खुशीनं झटकले.आपल्या लांब शेंडीला पीळदार गाठ मारली.अन् समोरच्या अंधाराकडे तो विजयी मुद्रेने पाहू लागला. गोदूच्या घशाला कोरड पडली होती. त्या भयंकर कटाच्या कल्पनेनेच तिचा जीव कोंडला. तिला आपल्याच श्वासाची भीती वाटू लागली, म्हणून तिने पदराचा बोळा करून तोंडात घातला आणि ती परसदाराकडे धावली.     बाहेरचं भिरभिरं वारं तिच्या मेंदूमध्ये घुसलं. तिच्या पावलांना विलक्षण गती प्राप्त झाली. तिने पागेतल्या खुंटावळ्यावरचं जिनसामान काढलं आणि साठसत्तर घोड्यांच्या पागेतून पाखऱ्या नावाचा बळीच्या पंखासारखा फुरफुरता घोडा निवडला. झटकन घोड्यावर उडी ठोकून तिने कचकन टाच मारून लगाम मागे खेचला, अन् रात्रीच्या थंडीवाऱ्यातून, अंधाराच्या डोहातून तिचा घोडा रायगडाच्या दिशेने झेप घेऊ लागला.     गोदू जशी काही वाच्याच्याच पाठीवर स्वार झाली होती. वाटेतल्या झाडांची, ओढ्याओघळींची, कशाकशाची तिला आता पर्वा नव्हती. रिकिबीमध्ये पाय रुतवून, पालथे पडून पाठीची कमान करीत ती रिकिवीतच अर्धीमुर्धी उभी राहत होती.

४। संभाजी
||| ==> पुढील पान : | प्रकरण-१ बिलामत | संभाजी-विश्वास पाटील |||

Comments